पुण्याच्या खराडीमध्ये हायप्रोफाईल रेव्हपार्टीवर पोलिसांचा छापा
पुणे शहरातील खराडी परिसरात असलेल्या एका उच्चभू्र गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये शरद पवार गटाचे नेेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गुन्हे शाखेस मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पथकाने रॅडिसन हॉटेलच्या मागे असलेल्या स्टे बर्ड नावाच्या गेस्ट हाऊसमध्ये ही करावाई केली. छापेमारीदरम्यान मोठ्या आवाजता गाणे सुरू होते आणि उपस्थित लोक अंमली पदार्थ, दारू, आणि हुक्क्याचे सेवन करत होते. पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. अटक केलेल्यांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.
पोलिसांनी या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, दारू व हुक्के जप्त केले आहेत. ही पार्टी डॉ. प्रांजल खेवलकर यांनी स्वत: आयेाजित केल्याची माहिती आहे. याशिवाय या प्रकरणात प्रसिद्ध बुकी निखिल पोपटानी याचेही नाव पुढे आले आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचा स्त्रोत आणि पुरवठादार कोण आहे. याचा शोध घेण्यासाठी पोलिस तपास करत आहेत. या कारवाईमुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत एकनाथ खडसे म्हणाले की, खरे सांगायचे तर, हे होणारच होते, हे मला आधीच माहित होते गेल्या काही दिवसांपासून विरोधात बोलणार्यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे ही घटनादेखील त्याचाच एक भाग असू शकते. स्थानिक पोलिस दबावाखाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही जो दोषी आहे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण हे सगळे जर एखादे षडयंत्र असेल, तर ते जनतेसमोर यायला हवे. खरं प्रकरणं काय आहे ते समोर आल्याशिवाय यावर बोलणं योग्य होणार नाही, फॉरेन्सीक लॅबचे रिपोर्ट, मेडीकल आदी बाबींची यामध्ये महत्वाच्या आहेत.

